कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास 2019-20 या सालाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज दि. 5 जून 2022 रोजी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. येथे राज्यस्तरीय साखर परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने जाहीर केलेल्या पुरस्काराचे वितरण, खा. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते, राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. मोहनराव कदम आदी उपस्थितीत होते. सदरचा पुरस्कार सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे, डी. बी. जाधव, माणिकराव पाटील, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, फायनान्सियल ॲडवायझर एच. टी. देसाई, चीफ अकाउंटंट जी. व्ही. पिसाळ यांनी स्वीकारला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे सन 2019-20 सालाचे ऑडिटेड जमाखर्च पत्रकांची छाननी केली. त्यामध्ये सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार प्रदान केलेला आहे. त्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा प्रति क्विंटल साखरेस आलेला रोखीचा उत्पादन खर्च रूपये 366.30 इतका असून तो राज्याच्या सरासरी प्रति क्विंटल रोखीच्या उत्पादन खर्चापेक्षा मोठ्या फरकाने कमी आहे. त्याचबरोबर साखर उत्पादन प्रक्रियेचा खर्च 813.75 प्रति क्विंटल असून तो ही राज्याच्या सरासरी साखर उत्पादन प्रकियेचा एकूण खर्चापेक्षा कमी असल्याचे छाननीत दिसून आले. कारखान्याच्या नक्त मुल्य, भांडवलाच्या पाया निर्देशांकात भरीव वाढ झाल्याचेही दिसून येत असल्याची वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने नोंद घेतली आहे. यासह विविध निकषांच्या आधारे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे यांनी कारखान्यास प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार जाहिर करून प्रदान केलेला आहे.
याप्रसंगी साखर आयुक्त शेखर गायकवाड, व्ही. एस. आयचे महाव्यवस्थापक शिवाजीराव देशमुख, नॅशनल फेडरेशनचे महाव्यवस्थापक नाईकनवरे, सांगलीचे विशालबापू पाटील, राज्यभरातून उच्चांकी ऊस उत्पादन घेतलेले, पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी व त्यांचे कुटुंबीय, राज्यातील विविध कारखान्यांचे चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी, त्याचबरोबर नॅशनल फेडरेशनचे व व्ही.एस.आय.चे पदाधिकारी अधिकारी आदी उपस्थित होते.