हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रुग्णालयात (All India Institute Of Ayurvedic Hospital) आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. या रुग्णालयात हृदयात 90 टक्के ब्लॉकेज असलेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेऐवजी आयुर्वेदिक उपचारांनी बरे करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही शस्त्रक्रियेऐवजी केवळ आयुर्वेदिक उपचारांमार्फत देखील हृदयविकार (Heart disease) झालेल्या रुग्णाला बरे केले जाऊ शकते, हे सिद्ध झाले आहे. तसेच, या घटनेमुळे अनेक रुग्णांसाठी आशेची किरण निर्माण झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबर 2022 रोजी दिल्ली येथील रहिवासी असलेल्या अवधेश कुमार यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर 15 दिवस उपचार करण्यात आले. अवधेश कुमार यांच्यावर अँजिओग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी दोन स्टेंट टाकण्याचा सल्ला दिला. परंतु उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे कुमार यांना पुन्हा घरी आणण्यात आले. पुढे, अवधेश कुमार यांचा त्रास वाढत गेला.
90 टक्क्यांपेक्षा अधिक ब्लॉकेज
शेवटी या त्रासाला कंटाळून त्यांनी दिल्लीतील बदरपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद गाठले. याठिकाणी उपचार घेत असताना कुमार यांच्या हृदयात 90 टक्क्यांपेक्षा अधिक ब्लॉकेज झाल्याचे आढळून आले. यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुरू केले. या काळात त्यांना काही आयुर्वेदिक औषधे देखील देण्यात आली. तब्बल 3 महिने आयुर्वेदिक औषधे घेतल्यानंतर त्यांची पुन्हा अँजिओग्राफी करण्यात आली. यावेळी त्यांच्या हृदयामध्ये 5 टक्क्यांपेक्षा कमी ब्लॉकेज आढळले.
आयुर्वेदिक उपचारातून झालेला हा फरक पाहून डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटले. त्यामुळे ही बाब सर्वत्र पसरली. आता अनेक रुग्णांचा विश्वास बसला आहे की, शस्त्रक्रिया न करता आयुर्वेदिक उपचाराने देखील हृदयविकार बरा केला जाऊ शकतो.