औरंगाबाद : दौलताबाद घाटात एका वाहनाने फुगे विकून शहरात परतणाऱ्या बाप लेकीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फुगे विकून वडील, त्यांची मुलगी आणि मुलीचा मामा एका दुचाकीवरून औरंगाबादला येत होते. त्यावेळी दौलताबाद घाटात सुसाट वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे तिघेही दूरवर फेकले गेले.जाधववाडी येथे राहणाऱ्या 23 वर्षीय मोनिका गणेश रेनवाला हिच्यासह तिच्या वडिलांचा ज्ञानेश्वर दामोदर परदेशी यांचाही या अपघातात मृत्यू झाला. मोनिकाचे मामा बद्री साईनाथ जाधव (वय 45) यांची प्रकृती गंभीर आहे.
औरंगाबाद येथील जाधववाडी येथे मोनिका तिच्या पती सोबत राहत होती. त्याचबरोबर तिचे वडील ज्ञानेश्वर परदेश सुद्धा काही दिवसांपासून जाधववाडीतच राहत होते. फुगे विकून ते सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. रविवारी सकाळी मोनिका, वडील ज्ञानेश्वर आणि मुलीचे मामा बद्री जाधव एकाच दुचाकीवर गेले होते. त्या अज्ञात वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे धडक बसताच दुचाकीवरील तिघेही उंचावरून लांब फेकले गेले.
त्या ठिकाणी असलेल्या वाहनधारक आणि स्थानिक तेथे पोहोचे पर्यंत मोनिकाचा मृत्यू झालेला होता.या अपघाताची माहिती मिळताच निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, इतर कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.