परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांचा ‘हा’ मोहरा उतरणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लांबलचक दाढी, पांढराशुभ्र सदरा, 400 गाड्यांचा ताफा आणि एखाद्या साउथच्या चित्रपटातील सुपरस्टारला लाजवेल अशी हालचाल… चार-पाच पिढ्यांपासून राजकारणात मुरलेल्या कुण्या अट्टल नेत्यांचं हे वर्णन नाहीये… तर हे वर्णन आहे साधासुधा कार्यकर्ता ते परळीच्या राजकारणातला हुकमी एक्का बनलेल्या शशिकांत पांडुरंग गित्ते उर्फ बबन गित्ते (Baban Gite) यांचं… बीडच्या लोकसभा निकालात पंकजा मुंडेंचा बजरंग बाप्पांनी पानिपत केलं… तर आता विधानसभेला धनंजय मुंडेंच्या आमदारकीवर आभाळ आलंय… आणि ते आणलय तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या याच बबन गित्ते यांनी… धनंजय मुंडेंनी केलेल्या गद्दारीचा हिशोब चुकता करण्यासाठी शरद पवारांनी परळीच्या राजकारणात एक नवा मोहरा फ्रंटला आणला, तो हाच बबन गित्ते… येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परळीतून घड्याळाकडून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विरुद्ध तुतारीच्या चिन्हावर बबन गित्ते यांच्यात लढत होणार असल्याचं जवळजवळ फिक्स मानलं जातंय… लोकसभेला झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर आता परळी वाचवणं हा धनंजय मुंडेंसाठी प्रतिष्ठेचाच नाही तर अस्तित्वाचाही मुद्दा बनलाय… पण मैदानात बबन गित्ते असल्यानं आमदारकी बरीच अवघड जाऊ शकते .. बीड पाठोपाठ परळीतूनही मुंडे कुटुंबाला राजकारणावर तुळशीपात्र ठेवण्याची वेळ का आलीय? धनुभाऊंच्या राजकारणाचा द एन्ड करून बबन गित्ते आमदारकीची तुतारी वाजवतील का? येणाऱ्या विधानसभेला परळीत किंगमेकर ठरणारे हे बबन गित्ते नेमके आहेत कोण? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…

२०१४ च्या निवडणूकीत पंकजा मुंडे यांना मी पाठींबा दिला म्हणून त्या निवडून आल्या आणि मंत्री झाल्या…. २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांना पाठींबा दिला ते निवडून आले आणि मंत्री झाले… थोडक्यात काय तर परळीत आपण ठरवलं तरच आमदार होत असतो, असं ऑन स्टेज छातीठोकपणे सांगणारे बबन गित्ते… पंकजा असो किंवा मग धनंजय मुंडे… यांना निवडणूक जिंकायची असेल तर बबन गित्तेंचा पाठींबा असावाच लागतो, असं परळीत बोललं जातं…. आणि याला कारण ठरतं ते त्यांचं परळीतील नेटवर्क… गोपीनाथ मुंडेंकडून बबन गित्ते यांनी राजकारणाची उजळणी पक्की केली… त्यांच्या नंतर पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजा मुंडेंना मदत केली. पण, पुढे मतभेद झाल्याने ते धनंजय मुंडेंसोबत गेले. त्यांच्या सोबत जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलीही…बबन गित्ते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या. पण बायकोची काम सगळे गित्ते करतात… म्हणून त्यांच्यावर आरोप होऊ लागले.. पुढे धनंजय मुंडेंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला.. इथेच धनंजय मुंडे आणि बबन गित्ते यांच्यात संघर्षाचा विस्तव पडला…

YouTube video player

पुढे एका प्रकरणात त्यांना जेलमध्येही जावं लागलं. मात्र, जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच विरोधकांना धडा शिकवायचा, असा निर्धार गित्ते यांनी केला…सुरुवातीपासूनच परळीच्या राजकारणात मुंडे कुटुंब प्रस्थापित असल्यानं बबन गित्ते यांच्या राजकारणाला मर्यादा यायच्या… पण त्यांना तो स्पेस मिळाला तो राष्ट्रवादी फुटीनंतर… धनुभाऊ अजितदादांसोबत गेल्याने बबन गित्तेंनी हीच ती वेळ म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.. आणि परळीत नव्या राजकीय शक्यतांचा जन्म झाला… मुंडे कुटुंब एकत्र येऊनही लोकसभेला पराभव झाल्यानं धनंजय मुंडेंचं निम्मं अवसान गळून गेलंय… या धक्क्यातून सावरत नाही तोच आमदारकी तोंडावर आलीये… आणि इथं आव्हान असणार आहे ते बबन गित्ते यांचं…

परळीतील येणारी विधानसभा निवडणूक बबन गित्ते विरुद्ध धनंजय मुंडे अशी होणार असल्याची दाट शक्यता आहे…जर आमदारकीला हे दोघे आमने-सामने आले तर गित्ते धनुभाऊंना पराभवाचा मोठा राजकीय धक्का देऊ शकतात… आणि याला कारण ठरेल ते म्हणजे परळीची जातीय समीकरणं… परळीच्या जातीय समीकरणाच्या राजकारणाचा विचार केला. तर, परळीत ४० टक्के मराठा मतदार आहे. ३० टक्के वंजारी मतदार तर उरलेले ३० टक्के मुस्लिम आणि इतर मतदार आहेत. मुंडे बंधू-भगिनी यांना मराठा समाजाच्या मतांशिवाय पर्याय उरत नाही… पण जरांगे फॅक्टरमुळे मराठा समाज मुंडे कुटुंबापासून लांब गेलाय…इतकंच काय तर लोकसभेला दिसलेला टोकाचा जातीयवाद पाहता मराठा समाजाला आपल्याकडे खेचून आणणं धनंजय मुंडेंसाठी सध्या तरी अशक्य अशी गोष्ट आहे… त्यात तुतारी चिन्हाकडे असणारी सहानुभूती आणि त्यात मराठा समाजाचा महाविकास आघाडीला असणारा पाठिंबा पाहता शरद पवारांनी जर का फिल्डिंग लावली तर बबन गित्ते मुंडे घराण्याच्या राजकारणाला सुरुंग लावत आमदार बनण्याचे सध्या सर्वाधिक चान्सेस आहेत…

बबन गित्ते हे नाव जरी नवीन असलं. तरीही त्यांचा स्थानिक राजकारणात असला दांडगा जनसंपर्क, तसेच मोठा पक्ष आणि नेतृत्वाची सर्व बाजूंची ताकद आणि फुटीच्या राजकारणाचा फायदा, हे सारं जर का बघितलं तर बबन गित्ते हे धनंजय मुंडेंपेक्षा नेहमीच प्लस मध्येच राहतायेत… 2019 ला बहीण भाऊ अशी कडवी झुंज परळीला बघायला मिळाली, तेव्हा गित्ते हे धनुभाऊंच्या पाठीशी उभे राहिल्याने त्यांचा विजय झाला, असं स्थानिक पत्रकारही सांगतात… त्यामुळे आता जर त्याच धनंजय मुंडेंच्या समोर बबन गित्ते असतील, तर परळीत कुठल्या लेव्हलचं राजकारण रंगेल याचा विचारच न केलेला बरा…बाकी लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर आता शरद पवारांनी परळीसाठी विधानसभेचा प्लॅन ऍक्टिव्हेट केलाय… लोकसभेला बजरंग बाप्पांना सोबत घेत शरद पवारांनी गुलाल उधळला… आता विधानसभेला बबन गित्ते यांच्या हातात तुतारी देत शरद पवारांना विजयाचा गुलाल उधळता येईल का? तुम्हाला काय वाटतं? परळीचा पुढचा आमदार कोण? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.