सांगली प्रतिनिधी | सांगली जिल्ह्यात आठवडा भरापासून सलग ढगाळ हवामान आणि पाऊस सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील ८० हजार एकरांपैकी तब्बल ६५ हजार एकरावरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. घडकूज, मनीगळ, डाऊनी रोग यामुळे यंदाही द्राक्षबागायतदारांना संकटाच्या खाईल लोटले आहे. फुलोरा अवस्थेत असणार्या ६५ हजार एकरांवरील द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून ७० टक्के द्राक्षांचे नुकसान झाले आहे.
गत वर्षीच्या हंगामात आगाप पीक छाटणी घेतलेल्या शेतकर्यांना खराब हवामानामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे यावर्षी बहूतांश शेतकर्यांनी आगाप छाटणी घेतली नाही. जिल्ह्यात ७९ हजार ४४० एकर क्षेत्रावर द्राक्षबाग आहे. त्यापैकी सुमारे ६५ हजार एकरांवरील द्राक्षबागांची छाटणी ऊशीराने केल्या. मात्र यावर्षी निसर्गाने ऊशीराने पीक छाटणी करणार्या शेतकर्यांना पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून ढगाळ हवामानासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे फुलोरा अवस्थेतील, तसेच १ नोव्हेंबरपर्यंत पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
सततच्या खराब हवामानामुळे फुलोरा अवस्थेत असणार्या द्राक्षघडांची कुज आणि मनीगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक बागांना डाऊनी रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. ६५ हजार एकरांवरील द्राक्षबागांचे ७० टक्क्यांपर्यंत नुकसान आतापर्यंत झाले आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार पुरते उध्दवस्त झाल्याचे चित्र आहे. उरली सुरली द्राक्षबाग वाचवण्यासाठी महागड्या औषधांची दिवसरात्र फवारणी करण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र आणखी चार दिवस ढगाळ हवामान राहणार असल्याने द्राक्षबागायतदारांचा जीव टांगणीला लागलाय.