बायकोने व्हिडिओ कॉलवर मुलीचा चेहरा न दाखवल्याने नाराज पतीने उचलले ‘हे’ पाऊल

बदलापूर : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये बायकोने व्हिडिओ कॉलवर मुलीचा चेहरा न दाखवल्याने नाराज झालेल्या पतीने आत्महत्या केली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीने होळी सणाच्या दिवशीही तान्ह्या मुलीचा चेहरा व्हिडीओ कॉलवर दाखवला नाही, या गोष्टीने व्यथित होऊन तरुणाने आत्महत्या केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीचा चेहरा पाहता न आल्याने पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
मृत तरुणाचे नाव शंकर जाधव असे असून तो बदलापूरच्या वडवली परिसरातील तलरेजा कॉलेजच्या बाजूला त्याची पत्नी, दोन महिन्यांची मुलगी आणि आई वडिलांसोबत राहत होता. मात्र त्याच्या पत्नीला वेगळं राहायचं असल्यानं ती शंकरसोबत वाद घालून माहेरी निघून गेली होती.

आत्महत्या करत असल्याचं बायकोला सांगितलं
होळीचा सण असल्याने तरी पत्नी मुलीला घेऊन घरी येईल अशी शंकरला अपेक्षा होती. पण पत्नी काय घरी आलीच नाही. यानंतर शंकरने तिला व्हिडिओ कॉल केला तेव्हा तिने शंकरला मुलीचं तोंड सुद्धा दाखवलं नाही. यामुळे व्यथित होऊन शंकरने आपण आत्महत्या करत असल्याचे आपल्या पत्नीला सांगितले. त्यानंतर त्याने बेडरूममध्ये गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला.

कुटुंबियांना मृतावस्थेत सापडला
यानंतर त्याच्या पत्नीने हि गोष्ट शेजारच्यांना सांगितली. त्यानंतर शंकरच्या घरच्यांनी बेडरूममध्ये धाव घेतली असता, शंकर मृतावस्थेत आढळून आला. शंकरने उचललेल्या या पावलामुळे शंकरचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.