हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक जणांनी यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यातच आता विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. अपघात झाला होता त्या दिवशी टोलनाक्यावरून त्यांची गाडी गेली तेव्हा मेटे गाडीतच नव्हते असा दावा त्यांनी केला आहे. तसेच मेटे यांच्या मृत्यूबाबत त्यांनी चालक एकनाथ कदम यांच्यावरही संशय व्यक्त केला आहे.
मेंटेच्या अपघातानंतर ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी फोनवर चुकीची माहिती दिली. ज्या दिवशी विनायक मेटे यांचा अपघात झाला होता, त्या वेळेस मी आणि शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषार काकडे हे गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या दिशेने निघालो होतो. तेव्हा मी माझ्या परिचयातील एका व्यक्तीला फोन केला. त्याने मला सांगितलं, की ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक यांना काहीही झालं नाही, मात्र विनायक मेटे यांनी जागी प्राण सोडला आहे.
यानंतर जेव्हा मी ड्रायव्हर एकनाथ कदम यांना फोन केला होता. ते बोलले की साहेब बरे आहेत, साहेबांना काही झालं नाही, मी २० मिनिटं साहेबांसोबत बोलतोय, ते व्यवस्थित आहेत, अशी माहिती ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी दिली. मात्र, मी विनायक मेटे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे ड्रायव्हर एकनाथ कदम यांच्या बोलण्याबाबत काय समजायचे? असा सवाल बाळासाहेब चव्हाण यांनी केला.
दरम्यान, विनायक मेटे यांच्या अपघातानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील संशय व्यक्त केला आहे. सध्या त्यांचा चालक एकनाथ कदम पोलिसांच्या ताब्यात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी सीआयडी कडे दिली आहे.