कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुका कोरोना विषाणुचा हाॅटस्पाॅट बनला आहे. पाहता पाहता तालुक्यातील कोरोनारुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. यावर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनही कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात वाढली असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
कोरोना हा आजार संपर्कातून होणारा आजार आहे. काल कराड तालुक्यात जे १२ नवे रुग्ण सापडले त्यांना संपर्कातूनच कोरोनाची लागण झाली असल्याचे तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे लाॅकडाउन हाच एकमेव पर्याय असून सोशल डिस्टंसिंगच्या सहाय्यानेच कोरोबाला हरवता येऊ शकते असं पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात सध्या ३३ कोरोना बाधित रुग्ण आहेत. जगभरात लाॅकडाउनच्या आधारेच कोरोनाविरुद्ध लढा दिला जात आहे. आपल्या जिल्ह्यातही नागरिक उत्स्फुर्तपणे लाॅकडाउन पाळत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण निश्चितच कोरोनावर मात करु असा विश्वासही पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.