कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे कोयना नदीवर १०५ टीएमसीचे धरण बांधून वीज निर्मितीसह शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठ्याचा लाभ झालेला आहे. याची तमाम महाराष्ट्रवासियांना जाणीव आहे. धरण बांधून ६२ वर्षे पूर्ण झाली परंतु विस्थापितांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाकडून अंदोलन केले जात आहे. आंदोलनात वृद्ध प्रकल्पग्रस्त व महिलांचा समावेश आहे. २२ दिवस पूर्ण झाले तरी राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली नसल्याने त्याची दखल घ्यावी, अशी मागणी माजी सहकारमंत्री, आ. बाळासाहेब पाटील यांनी विधान सभेत अधिवेशनात केली.
काल अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कोयनानगर येथील प्रकल्पग्रस्त आंदोलकांचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले, शमिका मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नी निवेदन सादर केले आहे.
त्यावर अद्याप काहीही विचार झाला नसल्यामुळे विस्थापितांचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नांसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांचे नेतृत्वाखाली दि. २७ फेब्रुवारी २०२३ पासून महाराष्ट्रातील धरण आणि प्रकल्पग्रस्तांचे कोयनानगर येथे अहिंसक मार्गाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे.
बाळासाहेब पाटलांनी अधिवेशनात मांडला कोयना धरनग्रस्तांच्या आंदोलनाचा प्रश्न pic.twitter.com/43ly6RMO55
— santosh gurav (@santosh29590931) March 22, 2023
याबाबतची माहिती शासनाला मिळालेली असूनही शासनाचा एकही प्रतिनिधी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन त्यांचेकडून कोणतेही ठोस लेखी आश्वासन दिले गेले नाही. याचा शासनाकडून लवकर निर्णय झाला नाही तर आंदोलकांचे आक्रमकतेमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. या आंदोलनात विशेषतः वृध्द प्रकल्पग्रस्त व महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या ठिय्या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी म्हंटले.