सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्याचे सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. १५ ऑगस्टदिवशीच ही माहिती समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.
तीन दिवसांपूर्वीच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आढावा बैठकीत नामदार बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते. या बैठकीला शरद पवार, राजेश टोपे, शंभूराज देसाई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित होते. कोरोनाचं निदान झाल्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमालाही बाळासाहेब पाटील यांना उपस्थित राहता आलं नाही.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच एकूण नियोजन प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण होणं धक्कादायक आहे. आपल्या नजीक संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगिकरणात रहावं अशी सूचना बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.