हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती. महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवून हिंदुत्त्वाची मशाल देशभर पोचवणारे बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण जीवन खऱ्या अर्थाने झंझावाती होते.
फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली.
मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे सतत लढले. आपल्या बेधडक भाषणाने बाळासाहेबांनी विरोधकांना अक्षरशः घायाळ केलं. आक्रमक हिंदुत्वाचा आणि कडव्या मुस्लिमविरोधाचा प्रखर पुरस्कार करताना बाळासाहेब ठाकरे अनेकदा टीकेचे आणि वादाचेही धनी झाले, पण त्यांनी कधीही आपला शब्द फिरवला नाही.
बाबरी मशीद पाडल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती, आणि जबाबदारी घ्यायला कोणी तयार नव्हते, तेव्हा जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असं बेधडक विधान बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. प्रत्येक मुस्लीम आपला शत्रू नाही, तर देशविरोधी मुस्लीमच शत्रू आहे हीच बाळासाहेबांची भूमिका होती.
१९९० या काळात, काश्मीर मधील इस्लामी दहशतवाद्यांनी कश्मिरी पंडितांना तिथून हकलावायला लावले होते. अमरनाथ यात्रा सुरू होती. दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रा थांबविण्याची धमकी दिली. दहशतवाद्यांनी असे धमकाविले की जो कोणी या यात्रेसाठी येईल तो परत घरी जाणार नाही. तेव्हा बाळासाहेबांनी असे निवेदन केले की, ९९% हज यात्रेकडे जाणार्या फ्लाइट मुंबई विमानतळावरून जातात. बघूया मक्का-मदीना ला येथून प्रवास कसा केला जातो आणि दुसऱ्याच दिवशी अमरनाथ यात्रा सुरू झाली.
बाळासाहेब ठाकरेंची विशेष गोष्ट म्हणजे ते कधीही कोणाला स्वत:हून भेटले नाहीत. ज्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे त्यांनी घरी यावे, असे त्यांचे मत होते. भारतातील सर्व महान हस्ती त्यांना भेटण्यासाठी मातोश्री, मुंबई येथे त्यांच्या घरी यायचे. बॉलीवूडमधील कलाकार त्यांच्या घरी भेटण्यासाठी यायचे. लिट्टे आणि हिटलर यांचे ते नेहमी कौतुक करायचे.