पाटण बाजार समिती सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोडांबे बिनविरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या तालुक्यापैकी एक असलेल्या पाटण तालुक्यात नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पाडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विक्रमसिह पाटणकर, सत्यजित पाटणकर यांच्या गटाविरुद्ध जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा गट उभा होता. निवडणुकीत देसाई यांच्या गटाला तब्बल 40 वर्षांनी सभापती, उपसभापती पदासह सत्ता मिळाली. यानंतर आज प्रत्यक्ष बाजार समितीच्या सभापतीपदी आडूळचे बाळकृष्ण रामचंद्र पाटील यांची तर उपसभापती म्हणून घोटीलचे विलास हरी गोडांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

आज पाटण तालुक्यातील मल्हारपेठ या ठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सभापती व उपसभापतीच्या निवडी करण्यात आल्या. त्यानंतर दोघांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, व्हाईस चेअरमन पांडुरंग नलवडे, कारखान्याचे संचालक सुनिल पानस्कर यांच्यासह देसाई गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उमेश उमरदंड, गिताजंली कुंभार, सचिव हरिभाऊ सुर्यवंशी यांनी प्रक्रिया पार पाडली. पाटण बाजार समितीच्या निवडणुकीत पाटणकर गटातून 3 जागा बिनविरोध झालेल्या होत्या तर सोसायटी व ग्रामपंचायतमधून 15 जागांवर मंत्री शंभूराज देसाई गटाने विजय मिळवत सत्तांतर घडवून आणले.