कोल्हापूर | शहरातील राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणून गंडा घालणाऱ्या राधानगरी तालुक्यातील दोघांना पोलिसांनी आज शुक्रवारी सकाळी बेड्या ठोकल्या. अनिकेत अनिल हळदकर (वय- 27, रा. चंद्रे, ता. राधानगरी), उत्तम शिवाजी पवार (वय- 23, रा. पालकरवाडी, कसबा वाळवा, ता. राधानगरी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुख्य संशयित अनिल हळदकर याने दि. 2 ऑगस्ट रोजी राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत स्वताःच्या खात्यावर दोन हजार रुपये किमतीच्या 67 नोटा जमा केल्या. चौकशीअंती 67 पैकी 17 नोटावर बॅंक कर्मचाऱ्यांना संशयास्पद आढळून आल्या. तसेच सर्व नोटावर एकच सिरीयल नंबर होता. तेव्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यास संपर्क साधून याविषयी माहिती दिली. पोलीस पथकाने अनिकेत हळदकर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता उत्तम पवार याने या बनावट नोटा खपविण्यासाठी हळदकरकडे दिल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने बुधवारी रात्री उशिरा उत्तम पवार याला ताब्यात घेतले. बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न चव्हाट्यावर आल्याने राधानगरी, खानापूर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बनावट नोटा छपाईचे साहित्य हस्तगत
उत्तम पवार यांच्या शेतातील खोलीवर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, उपनिरीक्षक दीपिका जोगळे व त्यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात नोटा छपाईसाठी लागणारी यंत्रसामुग्री, कागद आणि प्रिंटर असे साहित्य यावेळी हस्तगत करण्यात आले आहे. संशयितांनी गेल्या वर्षभरापासून बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस निरीक्षकांनी पत्रकारांना सांगितले.