बरेली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना काळात मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांनी कधी कोंबडा केला तर कधी रस्त्यावर बेडूक उड्या मारल्याचे व्हिडीओ आतापर्यंत व्हायरल झाले आहे. मात्र उत्तर प्रदेशातील एका ठिकाणी मास्क लावला नाही म्हणून गार्डने थेट ग्राहकावर गोळी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा Video समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून देशातील सद्यपरिस्थितीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
https://twitter.com/BawaNaaved/status/1408351560137003008
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये बँक ऑफ बडोदाकडून मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे एका ग्राहकाने मास्क न लावल्यामुळे बँकेच्या गार्डने त्याच्यावर गोळी झाडली आहे. यानंतर बराच वेळ ग्राहक बँकेतील फरशीवर पडून होता. त्याची पत्नी शेजारी बसून रडत होती. मात्र तरीही बँक कर्मचाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलली नाहीत. बऱ्याच वेळानंतर रेल्वे कर्मचाऱ्याला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात आरोपी गार्डला पोलिसांनी अटक केली आहे.
व्हिडीओमध्ये बँकेच्या गेटवर रेल्वे कर्मचारी जखमी अवस्थेत जमिनीवर पडून आहे. त्यांना गार्डने गोळी घातली आहे. हैराण करणारी बाब म्हणजे गोळी घातल्यानंतरही गार्डला आपण केलेल्या चुकीची जाणीव नाही. तर तो रेल्वे कर्मचाऱ्याला तुरुंगात पाठविणार असल्याचे बोलत आहे. रेल्वे कॉलनीत राहणारे राजेश राठोड पासबुकमध्ये एन्ट्री करवून घेण्यासाठी स्टेशन रोडजवळील बँक ऑफ बडोदामध्ये गेले होते. राजेशची पत्नी प्रियंका राठोडने सांगितलं की, राजेश यांनी मास्क लावला नव्हता, त्यामुळे गार्ड त्यांना बँकेत येऊ देत नव्हता. त्यानंतर राजेश घरी जाऊन मास्क घेऊन आले. मात्र तरीही गार्डने त्यांना बँकेत घेण्यास नकार दिला. लंच ब्रेक झाल्याचे सांगून गार्डने राजेशला नंतर येण्यात सांगितले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात गार्डने त्यांना गोळी घातली.
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसएसपी रोहित सिंह सजवाण यांनी सांगितले की, रेल्वे कर्मचारी आणि बँकेच्या गार्डमध्ये मास्कवरुन वाद झाला. आणि रागाच्या भरात गार्डने राजेशवर गोळी झाडली. या नंतर राजेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गार्डला अटक करण्यात आली आहे.