सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आढावा घेतला. यानंतर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक ते निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना मंत्री देसाई यांनी केल्या.
सातारा जिल्हाधिकार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंह, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री देसाई म्हणाले, तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आत्तापासून आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा. जिल्ह्यात दुपारी 4 वाजेपर्यंत शिथीलता देण्यात आली आहे. 4 नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस विभागाने कारवाई करावी. लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करतात का यावरही लक्ष ठेवावे.