परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणार्या बाभळगाव फाटा येथे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका शाखेत चोरट्यांनी 16 जानेवारी रोजी पहाटे धाडसी चोरी केली असून यावेळी बँकेतून तब्बल 1 लाख 78 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. पाथरी तालुक्यातील बाभळगाव फाटा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत चोरी झाल्याचा प्रकार 16 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आला.
याप्रकरणी सायंकाळी उशिरा बँकेचे व्यवस्थापक सुरेश मगर यांनी पाथरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी मध्ये बँकेच्या तिजोरीमध्ये शनिवार 15 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बँकेचे कामकाज संपल्यानंतर ठेवलेले 1 लाख 78 हजार 462 रुपये चोरी केल्याचे म्हटले आहे .फिर्यादी मध्ये म्हटले आहे की 15 जानेवारी रोजी बँकेचे शिपाई प्रवीण गायकवाड यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाथरी शाखेतून 5 लाख रुपये नगद दिवसभराच्या कामकाजासाठी बँकेत आणून जमा केले होते.
त्यानंतर उर्वरित एक लाख 78 हजार 462 रुपये सायंकाळी जमा करून बँक बंद करत घरी गेलो. यानंतर 16 जानेवारी रोजी सकाळी शिपाई प्रवीण गायकवाड हे साफसफाई करण्यासाठी बँकेकडे गेले असता त्यांना बँकेचे शटर उघडे असल्याचे दिसले. यानंतर अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे लक्षात आले. दरम्यान संध्याकाळी 3 ते 5 च्या सुमारास अज्ञात चोरटे चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. पाथरी पोलीसांचे पथक व परभणीहून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ठस्से तज्ञांचे पथक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते.