सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,
खरीप हंगाम २०१९-२० साठी पीक कर्जाचे उद्दिष्ट १ हजार ३३० कोटी रुपयांचे असून, उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व बँकांनी विशेष प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मेळावे गाव आणि मंडलनिहाय जून महिन्यापासून सुरू करण्यात येतील. यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे संबंधित विभागांनी त्वरित उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप २०१९ हंगाम पूर्व नियोजन बैठक जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात ६३१ गावांमधून ५६१ हेक्टर खरीपाचे ३.६८ लाख हेक्टर्स क्षेत्र आहे. खरीपासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज आवश्यक असते. राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
हंगामात सुमारे १३३० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे, ज्या बँकांना टार्गेट देण्यात आले आहे, त्यांनी उद्दिष्ट पूर्ण करावे, कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करता सहकार्य करावे, अशा सूचना बँकांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय निर्माण होऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी प्रत्येक तालुक्यातून मत्स्य शेतीसाठी शेततळ्यांची निवड करावी. प्रत्येक तालुक्यातून शेततळ्यांच्या संख्येनुसार उद्दिष्ट निर्धारित करून, त्याला चालना द्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी गटशेतीशी जोडले जावेत, यासाठी मिशन मोडवर काम करावे. पूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार यादी तयार करावी, असेही त्यांनी सूचित केले.