जालना : हॅलो महाराष्ट्र – जालनामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दारूच्या बाटलीसाठी बारचालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. धुळवडीच्या दिवशी ड्राय डे असल्यामुळे दारू न दिल्यानं संतापलेल्या टोळक्याने काउंटरमध्ये घुसून बारचालकाला पायाखाली तुडवत बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) March 22, 2022
जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे सर्जेराव कुमकर यांच्या मालकीचा हॉटेल जंजिरा बार आहे. धुळवड असल्यामुळे ड्राय डे होता. सर्जेराव कुमकर यांनी धुळवडीच्या दिवशी बार बंद ठेऊन फक्त हॉटेल सुरू ठेवले होते. त्याचवेळी काही तरुण मंडळी तेथे आली आणि त्यांनी दारूची मागणी केली. ड्राय डे असल्याने दारू विक्री बंद असून फक्त जेवणासाठी हॉटेल सुरू असल्याचे वेटरने सांगितले. मात्र तरीसुद्धा या टोळक्याने वेटरकडे दारूची मागणी केली. तसेच यांच्यामधील काही जणांनी काऊंटरवर जाऊन मॅनेजर अविनाश देशमाने यांच्याशी हुज्जत घातली.
पण मॅनेजर अविनाश देशमाने यांनी दारूची बाटली देता येणार नाही, असं स्पष्ट सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या या टोळक्याने थेट काउंटरवर जाऊन मॅनेजर अविनाश देशमानेला मारहाण सुरू केली. हा सर्व प्रकार बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मारहाणीनंतर हे टोळके घटनास्थळावरून पसार झाले. यानंतर बारमालक सर्जेराव कुमकर यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टोळक्यांचा शोध घेत आहेत.