Baramati Lok Sabha 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांसोबत फारकत घेत आपल्या समर्थक आमदारांसह वेगळी चूल मांडली आणि शिंदे- फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी सुद्धा झाले. अजितदादांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि खास करून राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप झाला. आता निवडणूक आयोगाने अजितदादांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दिल्यानंतर अजित पवार बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत. सुप्रिया सुळेंना तगडी टक्कर देण्यासाठी अजितदादा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभेसाठी मैदानात उतरवण्याची खेळी करण्याची शक्यता आहे. त्यातच आता बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रचाररथ फिरू लागल्याने या शक्यतांना आणखी बळ मिळत आहे. असं झाल्यास बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा थेट सामना (Supriya Sule Vs Sunetra Pawar) पाहायला मिळू शकतो.
गेल्या काही दिवसापासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. गुरुवारी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच हळदी कुंकूच्या माध्यमातून महिलांना भेटत आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेसाठी अजित पवार सुनेत्रा पवारांना उमेदवार म्हणून जाहीर करणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यात भरीस भर म्हणजे बारामतीत सुनेत्रा पवार यांचा प्रचार रथ फिरत आहे. यामध्ये सुनेत्रा पवार यांचा भलामोठा फोटो, त्याशेजारी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्हही दिसत आहे. त्यामुळे एकप्रकारे आत्तापासूनच सुनेत्रा पवार यांनी प्रचार सुरु केला आहे.
दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांचा विकासरथ सुद्धा बारामतीत फिरत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांची आत्तापर्यंतची खासदार म्हणून कामगिरी, त्यांना मिळालेले संसदरत्न पुरस्कार, त्यांनी केलेली विविध विकासकामे याचा उल्लेख करण्यात आला आहे. या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांचे कार्य मतदारांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. अजित पवारांनी वेगळी भूमिका मांडल्यानंतर सुप्रिया सुळे सुद्धा पायाला भिंगरी बांधल्या सारखं बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील सामना आता अटळ आहे असं बोललं जात आहे.
बारामतीमध्ये कोणाची ताकद जास्त – Baramati Lok Sabha 2024
बारामती (Baramati Lok Sabha 2024) हा खरं तर शरद पवार यांचा बालेकिल्ला… शरद पवारांमुळेच बारामतीचे नाव देशभर पोचले. बारामतीचे रस्ते, शैक्षणिक संस्था, साखर कारखाने , दूध संघ आदींच्या माध्यमातून पवारांनी बारामतीचा विकास केला. नंतर शरद पवार देशाच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांकडे बारामतीची सूत्रे दिली. सुप्रिया सुळे लोकसभेला आणि अजितदादा विधानसभेला असच गणित पवारांनी राखलं. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती मात्र उलटी आहे. अजित पवार याना भाजपचा पाठिंबा मिळणार आहे. बारामती लोकसभेअंतर्गत बारामती, पुरंदर, खडकवासला, भोर, दौंड आणि इंदापूर हे तालुके येतात. यातील खडकवासला येथे भाजप मजबूत आहे, इंदापूरात भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचे समर्थक आमदार दत्ता भरणे यांचेच वर्चस्व आहे त्यामुळे त्याठिकाणी सुनेत्रा पवारांचे पारडे जड आहे. पुरंदरमध्ये शिंदे गटाच्या विजय शिवतारेंची साथ सुद्धा सुनेत्रा पवारांना मिळण्याची शक्यता आहे. दौंड मध्ये भाजपचे राहुल कुल हे सुद्धा युतीधर्म म्हणून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे राहतील. तर भोर मध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे मात्र सुप्रिया ताईंच्या मागे आपली ताकद लावतील. अशा परिस्थितीत कागदावर तरी सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक म्हणावी तशी सोप्पी वाटत नाही. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी काही वेगळा डाव टाकला तर परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे.