हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२२ साठी आज लिलाव प्रक्रिया पार पडली असून मुंबईचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर मालामाल झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस ला तब्बल 12.25 कोटींची मोठी रक्कम देत आपल्या संघात घेतले. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार होऊ शकतो, असे मानले जात आहे. या संघाला सध्या कर्णधार नाही.
श्रेयस अय्यर दुसऱ्यांदा आयपीएल लिलावात उतरला होता. यापूर्वी 2015 मध्ये दिल्लीने अय्यरला 2.6 कोटी रुपयांना विकत घेतले. अय्यरने पदार्पणाच्या मोसमात 14 सामन्यात 439 धावा करून आपली क्षमता सिद्ध केली होती, त्यानंतर दिल्ली संघाने त्याला कायम ठेवले होते . मात्र त्यानंतर दिल्लीने त्याला रिलीज केलं होत .
श्रेयस अय्यरचा आयपीएल रेकॉर्ड अप्रतिम आहे. त्याने 87 सामन्यात 31.66 च्या सरासरीने 2375 धावा केल्या आहेत. अय्यर मधल्या फळीत क्रमांकावरून फलंदाजी करतो. अय्यरने आयपीएलच्या 7 हंगामात भाग घेतला आहे, त्यापैकी 4 वेळा त्याने 400 हून अधिक धावा केल्या आहेत. अय्यरने 2020 मध्ये 34 च्या सरासरीने 519 धावा केल्या. 2019 मध्ये त्याने 30.86 च्या सरासरीने 463 धावा केल्या. 2015 मध्ये त्याच्या बॅटमधून 439 धावा झाल्या होत्या. 2018 मध्ये तो 411 धावा करण्यात यशस्वी झाला. 2016 मध्ये अय्यरला 6 सामन्यात केवळ 30 धावा करता आल्या होत्या. गेल्या मोसमाबद्दल बोलायचे झाल्यास, श्रेयस अय्यर दुखापतीमुळे केवळ 8 सामने खेळू शकला आणि त्याच्या बॅटने 35 च्या सरासरीने केवळ 175 धावा केल्या.