सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरालगत असणाऱ्या करंजे भागात शुक्रवारी रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. काही युवकांनी मोठमोठी दगडे घेवून एकमेकांवर फेकण्याचा प्रयत्न केल्याचे चित्रीकरण व्हायरल झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल शुक्रवारी दि. 12 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास करंजे गावात मारहाणीची घटना घडली. दोन गटातील युवक समोर- समोर आले होते. जवळपास 20 ते 25 युवकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. तसेच काहीजणांच्या हातात धारदार शस्त्रेही होती. मारहाणीचा हा प्रकार बराच वेळ सुरू होता. या घटनेचे मोबाईल मध्ये चित्रीकरण झाले असून ही क्लिप आता व्हायरल होवू लागली आहे.
सातारा शहरातून मेढा रोडला जाणाऱ्या मार्गावर करंजे गावची मुख्य कमान आहे. याठिकाणी रात्री उशिरा हाणामारीचा प्रकार घडला. भांडणात एक महिलाही घटनास्थळी असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती.