सावधान ! औरंगाबादेत पुढील चार दिवस विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

औरंगाबाद – परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला मुसळधार पावसाला अजूनही सामोरे जावे लागत आहे . मराठवाड्यातील विविध भागात सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो. काही काळ ऊन राहते. पण दुपारनंतर ऊन-पावसाचा खेळ सुरु होतोय. वातावरण पूर्णपणे स्वच्छ असतानाच अचानक झाकोळून येतं आणि ढगांचा प्रचंड गडगडाट ऐकू येतो. क्षणात पावसाला सुरुवात होते. त्या पाठोपाठ वीजांचा कडकडाट सुरु होतो. मागील पंधरा दिवसात अतिवृष्टीचं संकट कोसळलेल्या मराठवाड्याला आता या निसर्गाच्या लहरीपणानं जेरीस आणलं आहे. ढगांचा गडगडाट सुरु झाला की नागरिकांना आता धडकी भरत आहे. आता हा पाऊस आणखी काय चित्र दाखवणार, हीच चिंता ग्रामीण भागापासून शहरी भागातील नागरिकांना सतावत आहे.

दरम्यान, आज 04 ऑक्टोबर रोजीदेखील औरंगाबादह परिसरातील ग्रामीण भागात वीजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. जालना, परभणी, हिंगोलीसह नांदेडमध्येही तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. पुढील चार-पाच दिवसातदेखील मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अशा वेळी ग्रामीण भागातील लोकांनी जास्त सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कडक ऊन आणि मुसळधार पावसाचा जणू लपंडावच सुरु आहे. सकाळपासून वातावरणात कमालीचा उकाडा आहे. आकाशातून स्वच्छ सूर्यप्रकाशही येतो आहे. पण काही मिनिटातच ढग दाटून येत धो-धो पावसाचा मारा होत आहे. यामुळे परिसरातील लोक गोंधळून जात आहेत.

You might also like