खटाव | कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने विनामास्क गावातून फिरत असल्याबाबत आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ तुकराम सरगर यांनी दादा बापू पुकळे याला (गारुडी, ता. खटाव) जाब विचारला. मायणी पोलिस ठाण्यात दादा पुळके याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
गारुडीत कोरोना रुग्णांची संख्या पन्नाशीच्या जवळ पोचली आहे. दिवसागणिक वाढणारे रुग्ण वडूज, मायणी, खटाव व विटा, इस्लामपूर (सांगली) येथे उपचार घेत आहेत. वाढलेल्या रुग्णांमुळे गावकऱ्यांनी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. याबाबत सरगर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की काल रात्री साडेसातच्या सुमारास दादा पुकळे हा विनामास्क फिरत असून, त्यास चांगदेव मंदिराजवळ कोरोना समितीसमोर हजर राहण्यासाठी मी फोन केला. त्यावर पुकळे यांनी मी येणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगत फोन कट केला.
थोड्या वेळाने मंदिरासमोर पुकळे याने भरधाव वेगाने चारचाकी गाडी आणत. आपणास शिवीगाळ करीत लोखंडी पंचने डोक्यास मारहाण केली. मारहाणीत पुकळे याने 32 ग्रॅमची सोन्याची चैनही तोडून नेल्याची तक्रार सरगर यांनी दिली आहे. दरम्यान जखमी झालेल्या सरगर यांना रात्री ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मायणीत दाखल केले. त्यानंतर रात्री उशिरा सातारा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा