हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड… स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा… पावसाने कायमच दडी मारल्यानं आर्थिक गणित कोलमडलेला आणि हातात ऊस तोडीचा कोयता दिलेला बीड जिल्हा… बीडच्या राजकारणात मुंडे कुटुंबाचा शब्द हा अंतिम समजला जातो. म्हणूनच मागील तीन टर्ममध्ये या मतदारसंघावर मुंडे कुटुंबानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं…मुंडेंच्या पुण्याईने भाजपला महाराष्ट्रात हात पाय पसरता. त्यात विरोधात असलेले धनंजय मुंडे आता महायुतीमुळे जवळ आलेत. यंदा बीडमध्ये लोकसभेचे तिकीट (Beed Lok Sabha) कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष्य होते… विद्यमान खासदार प्रीतम मुंडे याना भाजप तिसऱ्यांदा संधी देणार कि पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपवणार असा प्रश्न पडला असतानाच भाजपने पंकजा मुंडे यांना तिकीट देऊन धक्कातंत्र वापरलं.
पंकजा मुंडे या महाराष्ट्र भाजपमधील एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जातात. गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार म्हणून पंजा मुंडेंकडे बघितलं जाते. २०१४ मध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभाग सोपवण्यात आला होता. त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोपही त्या काळात झाले होते. याचाच फटका त्यांना २०१९ च्या निवडणुकीत बसला. भाऊ धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढून पंकजा मुंडेंचा पराभव केला होता. त्यानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन भाजपने केलं नव्हतं.. अधून मधून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या, पंकजा भाजपला रामराम ठोकणार अशा चर्चाही सुरु होत्या, मात्र पंकजा मुंडेंनी संयम राखत भाजपची एकनिष्ठता दाखवली. त्याचेच फळ म्हणून त्यांना लोकसभेचे तिकीट मिळालं. परंतु यासाठी त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचा मात्र राजकीय बळी गेला. कारण प्रीतम मुंडे या बीडच्या विद्यमान खासदार असून त्यांच्या जागीच भाजपने पंकजा मुंडेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.
पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करून नाराज असलेल्या ओबीसी समाजाला पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करेल. भाजप पंकजा मुंडेंवर अन्याय करत आहे अशी भावना कार्यकर्त्यांची होती, त्यातून भाजपबद्दल नाराजी सुद्धा दिवसेंदिवस वाढत होती. आता मात्र पंकजा मुंडेंना लोकसभेला उतरवून भाजप या सर्व मतदारांची नाराजी दूर करेल. पक्षात कितीही आयाराम आले तरी भाजप जुन्या नेत्यांना न्याय देत आहे असा संदेश पंकजा मुंडेंच्या उमेदवारीने महारष्ट्राभर पोचेल आणि आपोआपोच याचा फायदा भाजपलाच होईल.
2019 च्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात काय झालं?
प्रीतम मुंडे (Pritam Munde) 2019 लोकसभा मतदारसंघातून उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू जाधव विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र यात अपेक्षेप्रमाणे डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर 1 लाख 78 हजार 920 मतांनी दणदणीत विजय मिळवला.बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघांमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे ही लढत अगदी ग्रामपंचायत पातळीपासून पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. मात्र या बहिण भावांच्यामधील वितुष्ट संपल्यानं परळीत पंकजा मुंडे यांना नो टेन्शन आहे. त्यासोबतच केज, बीड, आष्टी, गेवराई आणि माजलगाव या मतदारसंघांचाही बीड लोकसभा मतारसंघांत समावेश होतो. पक्षीय बलाबलाचा विचार केला तर लोकसभा मतदारसंघातील सहा आमदारांपैकी पाच आमदार हे महायुतीच्या बाजूने आहेत तर एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटासोबत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.