बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.येळंब घाट परिसरात एका तरुणावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ३ जणांविरोधात नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमकं प्रकरण
जखमी झालेल्या तरुणाचे नाव बबलू पवार आहे. बबलू पवार या तरुणावर येळंब घाट परिसरामध्ये भर दुपारी हल्ला करण्यात आला. बबलू पवार यांच्या शरिरावर धारदार हत्याराने वार करण्यात आला. बबलू पवार हा एक ते दीड तास रस्त्याच्या कडेला तडफडत पडला होता. तेव्हा स्थानिक नागरिकांनी त्याला पहिले पण कोणीसुद्धा त्याच्या मदतीला धावले नाही. त्यानंतर पत्रकरांनी रुग्णवाहिकेला फोन केला आणि त्याला उपचारासाठी नेकनूरला पाठवले. यानंतर त्याला बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या बबलू पवार याची प्रकृती गंभीर असून बीड येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या आरोपी मधुकर पवार यांच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. यानंतर पोलीस घटनास्थळी येईपर्यंत कोणीही ट्रॅक्टर विझवण्यासाठी किंवा अगदी ट्रॅक्टरच्या जवळच बांधलेल्या जनावरांना वाचवण्यासाठी गेले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी जनावरांना बाजूला करत स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टरला लागलेली आग विझवली. हा हल्ला भावकीच्या वादातून झाल्याचे समजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. पण या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.