दिल्लीतील स्फोटाशी संबंधित सापडला एक लिफाफा; लिफाफ्यातून समोर आला ‘हा’ मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी झालेल्या स्फोटाशी संबंधित एक लिफाफा सापडला आहे. यातून स्फोटाचा इराणशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या लिफाफ्यात हा स्फोट म्हणजे फक्त ट्रेलर असल्याचे सांगण्यात आले असून बदल्याची भाषा करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, यात 2020 मध्ये मारल्या गेलेल्या कासिम सुलेमानी आणि इराणचे वरिष्ठ न्यूक्लियर सायंटिस्ट मोहसिन फखरीजादेह यांचाही उल्लेख आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणा या लिफाफ्याची टच डीएनए करणार आहे. इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद संदर्भात सांगण्यात येत आहे, की ही संस्था आपल्या पातळीवर काम करते. मात्र, अजून मोसाद घटनास्थळी पोहचंल्याचे कुठलेही वृत्त नाही. लिफाफ्यातून समोर आलेल्या प्राथमिक माहितीनंतर, या घटनेमागे इराणचा संबंध असल्याची शंका बळावली आहे. यापूर्वी 2012 मध्ये इस्रायलच्या एका कारमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटातही इराणचेच दोन लोक सहभागी होते. या घटनेनंतर ते फरार झाले होते. विशेष म्हणजे हे लोक दिल्ली येथील पहाडगंज हॉटेलमध्ये थांबले होते. गुप्तचर संस्थां अद्यापही त्यांच्या शोधात आहेत.

इस्रायली दूतावासजवळील या स्फोटाचे पडसाद आता इस्रायलमध्ये उमटले आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही दहशतवादी घटना असल्याचं म्हटले आहे. तसेच, या घटनेसंदर्भात परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनजी यांना नियमितपणे अपडेट दिले जात आहेत, असेही इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, सरकारी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहे. इस्रायलच्या सर्व संस्थांची आणि दुतावासांची सुरक्षा वाढवली आहे. तसंच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली. तर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट हा अत्यंत कमी तीव्रतेचा आयईडी स्फोट होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जवळपास पार्क केलेल्या तीन वाहनांच्या काचा फोडून कोणत्याही मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही. प्राथमिक तपासणीत हा प्रकार खळबळ उडवून देण्यासाठी कोणीतरी ही खोडी केल्याचं दिसून येतंय, असं पोलिसांचं म्हणणं आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव ( delhi police commissioner ) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या विशेष विभागाकडून याची चौकशी सुरू आहे. आताच्या घडीला यापेक्षा अधिक काही सांगता येणार नाही, असं एस.एन. श्रीवास्तव म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment