औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे बर्याच जणांचे रोजगार ठप्प झाले आहेत. हातावर पोट असलेल्याची स्थिती बिकट आहे. गरिबांना मदत मिळण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना पाच किलो धान्य मोफत मिळेल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.
या योजनेअंतर्गत 3 लाख 21 हजार 821 लाभार्थ्यांना 965 मेट्रिक टन गहू तर 644 मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. लाभार्थी कुटुंबातील 20 लाख 8 हजार 530 लाभार्थ्यांना 3 हजार 26 मेट्रिक टन गहू तर 4017 मेट्रिक टन तांदूळ देण्यात येणार आहे.
प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रतिमाह पाच किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. सर्व पात्र शिधा पत्रिकाधारकांसाठी रस्तभाव दुकानातून नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त प्रतिसदस्य मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. एक देश एक रेशनकार्ड योजनेंतर्गत कोणत्याही लाभार्थ्यांना कोणत्याही राज्यातील किंवा जिल्ह्यातील राशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांंनी मोफत धान्य घ्यावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.