हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बेंगळुरू- म्हैसूर Expressway चे अप्रतिम फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या एक्सप्रेस वेचे उदघाटन फेब्रुवारी 2023 मध्ये होण्याची अपेक्षा आहे. हा एक्स्प्रेस वे बेंगळुरूच्या बाहेरील NICE रोडजवळ सुरू होतो आणि म्हैसूरमधील आऊटर रिंग रोड जंक्शनवर संपतो.

बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे 10 लेनचा असून 118 किलोमीटर लांबीचा आहे. या नव्या महामार्गामुळे प्रवाशांचा दीड तासांचा वेळ वाचणार आहे. यापूर्वी दोन्ही शहरातून प्रवास करण्यासाठी सुमारे 3 तासांचा वेळ लागत होता. आता मात्र नव्या एक्स्प्रेस वे मुळे अवघ्या ९० मिनिटात तुम्ही प्रवास करू शकणार आहात.

बेंगळुरू ते म्हैसूर एक्स्प्रेस वेच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित केले जाईल. या महामार्गामुळे प्रवासी श्रीरंगपटना शहराकडे न जाता थेट म्हैसूरहून मंड्याच्या दिशेने जाऊ शकतात.

या एकूण संपूर्ण एक्स्प्रेसवे पट्ट्यामध्ये बिदाडी (7-किमी), रामनगरा आणि चन्नापटना (22-किमी), मद्दूर (7-किमी), मांड्या (10-किमी) आणि श्रीरंगपट्टना (7-किमी) येथे सहा बायपास आहेत. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि रस्ता सुरक्षा वाढेल.

या एक्स्प्रेसवेमुळे म्हैसूर, श्रीरंगपट्टणातील पर्यटनाचा विकास होण्यास मदत होणार आहे.

कर्नाटक हे देशातील महत्वाचे राज्य असून येथील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यानुसार 200 लोकांची क्षमता असलेली डबल डेकर स्काय बस सुरू करण्याचाही विचार केला जाईल असं गडकरींनी सांगितलं.




