सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील श्री नवलाईदेवीची भद्रकलश मिरवणूक बुधवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या सहभागातून पार पडली. आपल्या डोक्यावर पेटते भद्रकलश घेतलेले हजारो आबालवृद्ध भाविक ‘श्री नवलाईदेवीच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करत होते. कोरोना संसर्ग आणि त्यामुळे सर्वांनाच सामोरे जावे लागलेल्या लॉकडाउनमुळे गेली दोन वर्षे येथील श्री नवलाईची वार्षिक यात्रा व भद्रकलश मिरवणूक होऊ शकली नव्हती. त्यामुळे चारशे वर्षाची परंपरा असलेल्या या यात्रेस व मिरवणुकीला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
श्री नवलाईदेवीला नवस बोललेले भाविक नवस पूर्ण करण्यासाठी मसाई मंदिरामागे मातीचे मडके अर्धे फोडून अर्ध्या मडक्यामधे चंदन, लाकडाचा भुस्सा, कापड टाकून पेटवून ते अर्धे मडके आपल्या डोक्यावर घेऊन श्री नवलाई मंदिरापर्यंत मिरवणुकीने आले. काहींनी अगदी सात अर्धी मडकी डोक्यावर घेतलेली होती. मंदिरामागे मिरवणुकीचे विसर्जन झाले. सहभागी सर्व भाविक ‘श्री नवलाईदेवीच्या नावानं चांगभलं “चा जयघोष करत होते.
दरम्यान, आज गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत लोकनाट्य तमाशा, सायंकाळी पाच वाजता कुस्त्यांचा आखाडा आयोजिला आहे. शुक्रवारी (ता. आठ) बैलगाड्यांच्या शर्यती आयोजिल्या असून, विजेत्या बैलगाड्यांना अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार, १५ हजार, ११ हजार, सात हजार व पाच हजार अशी रोख बक्षिसे व ढाली देण्यात येतील. रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.