सांगली | जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने मागील काही दिवसांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यातच कर्नाटक मधल्या बेल्लारी येथून ऑक्सिजनचा होणार पुरवठा थांबला होता. जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी, पालकमंत्री यांच्याशी बोलून आम्ही धडपड केली. ऑक्सिजनची टंचाई कमी करण्यासाठी पुण्यातून दररोज ४४ टन पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे सद्य स्थितीला जिल्ह्यात कोणतीही ऑक्सिजनची टंचाई नाही अशी माहिती कृषीराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली. ते सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच भारती विद्यापीठ संलग्नित भारती कॉलेज मार्फत पुणे आणि सांगलीमध्ये प्रत्येकी साडेचार कोटी रुपये खर्चून तीन ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. या प्लांटचे लवकरच काम सुरु होणार असून यातून दर मिनिटाला १५०० लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. त्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील, मी स्वतः आणि प्रशासनाने प्रयत्न करुन जिल्ह्यासाठी ४४ टन ऑक्सिजन उपलब्ध केला आहे. जिल्ह्याची गरज ४० टन ऑक्सिजनची आहे. जिल्ह्यासाठी पुरेसा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असला तरीही जिल्ह्यासाठी आजच्या तारखेला १२०० डोस उपलब्ध आहेत. त्यातील ६०० खाजगी आणि ६०० शासकीय रुग्णालयांसाठी आहेत.शासनाच्या धोरणानुसार जिल्हा वार्षिक निधीतील दहा टक्के निधी हा कोविडसाठी खर्च करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्याच्या वार्षिक निधीतील दहा टक्के म्हणजेच सुमारे ३० ते ३२ कोटी रुपये कोविडसाठी खर्च करण्यात येणार आहेत, असे डॉ. कदम म्हणाले.
कोरोनाबाधितांसाठी व्हेन्टिलेटरचा सरसकट वापर चुकीचा आहे. त्याबाबत डॉक्टरांशी चर्चा करुन व्युहरचना ठरविणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांसाठी ऑक्सिजनची सोय करण्यात येणार आहे. मिरज शासकीय रुग्णालयासाठी 125 तर जत, विटा, आटपाडी, कडेगाव, पलूस, भिवघाट, चिंचणी वांगी येथील आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 31 जंबो ऑक्सीजन सिलेंडर देण्यात येतील. माडग्याळ आणि कवठेमहांकाळसाठी प्रत्येकी 58 ऑक्सिजन सिलिंडर देण्यात येणार आहेत. यासाठी थोडा वेळ लागेल मात्र त्याची पूर्तता निश्चित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.याबरोबरच व्हेंटिलेटरही उपलब्ध करण्यात येणार आहेत.
पुण्यातून दररोज 44 टन ऑक्सिजन
ऑक्सिजन बेड आहेत, पण ऑक्सिजनचा आणि व्हेन्टिलेटरचा वापर चुकत आहे. त्यावर निर्बंध गरजेचे आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांसाठीच व्हेन्टिलेटर वापरावा. कर्नाटक राज्याने ऑक्सिजन रोखण्यापूर्वी राज्य सरकारशी चर्चा करणं गरजेचं होत मात्र, तस झालं नाही. आता आम्ही परिस्थतीवर मात केली आहे. ऑक्सिजनची टंचाई कमी करण्यासाठी पुण्यातून दररोज ४४ टन पुरवठ्याची व्यवस्था केली आहे. मिरज कोविड रुग्णालय व अन्य खासगी रुग्णालयात मिळून १२०० रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलध असल्याचे डाॅ. कदम यांनी सांगितले.