हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून सत्ताधारी भाजप विरोधक महाविकास आघाडीत पहिल्याच दिवशी खडाजंगी पाहायला मिळाली. सरकारकडून विधेयक सादर केलं जात असतानाच आकडेवारीतील गोंधळामुळे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त करत सरकारला धारेवर धरले. त्याच वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी परिस्थिती सावरत शांतपणे सत्ताधारी गटाला त्यांची चूक लक्षात आणून दिली.
नेमकं काय घडलं?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयक क्रमांक १७ मांडण्याच्या सूचना मंत्र्यांना दिल्या. मात्र मंत्री गिरीश महाजन याना विधेयक क्रमांक १८ महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक सभागृहात मांडले. हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता विधानसभा अध्यक्षांनी मात्र विधेयक क्रमांक १७ महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा विधेयक मंजूर केल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. यानंतर भास्कर जाधव यांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले.
आपण कामकाज रेटून नेऊ नका, आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. काही उणीव किंवा चुका राहत असतील तर आमचं ऐकून तरी घ्या, असा सवाल भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांनाच केला. यावेळी संतापलेले भास्कर जाधव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यातच खडाजंगी पाहायला मिळाली. आपण विधेयक १६ पुकारलं, मंत्री महोदयांनी १७ मांडले. रेकॉर्ड चेक करा. त्यावर अध्यक्षांनी मी १७ पुकारलं असं सांगितले. त्यावर भास्कर जाधव पुन्हा संतापले, अख्खं सभागृह खोटं बोलतंय तुम्ही खरे बोलताय का? असा सवाल त्यांनी नार्वेकर यांना केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी परिस्थिती सावरत शांतपणे सत्ताधारी गटाला त्यांची चूक लक्षात आणून दिली. खात्याचे विधेयक मांडताना व्यवस्थित आकडे मांडले गेले पाहिजेत असे ते म्हणाले.