#HappyDiwali : भाऊ बीज (Bhau Beej) हिंदूंच्या दिवाळी सणातील एक महत्त्वाच दिवस आहे. भाऊ-बहीण यांच्या नात्याचा सोहळा या दिवशी साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीया किंवा यमद्वितीया या दिवशी हा सण साजरा करतात. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर (बीज) दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात.
या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊ बीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची. (Bhau Beej Information in Marathi)
या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे हिंदू धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे.
भावा बहिणीच्या प्रेमाचा हा सण आहे व त्यांतून त्याचं नातं वृद्धींगत व्हावं, दृढ व्हावं हा उद्देश असतो. नेहमीच्या धकाधकीच्या काळात आपल्या नात्यांमधील गोडवा जपण्यासाठी असे सण साजरे केले जातात. त्याचाच हाही एक भाग आहे. इतिहासात याचे अनेक दाखले मिळतात. कृष्ण आणि द्रोपदी यांच्या नात्याविषयी आपल्याला माहिती आहेच. मानलेलं भावा बहिणीचं नातं याच भरोवशावर टिकवण्यात येतं. अशी अनेक उदाहरणं आपल्या अवतीभवतीच असतात. या सर्व नात्यांचा गौरव करण्याचा हा सण आहे. (Bhau Beej Information in Marathi)
प्रतीक पुरी