कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर येथील भूस्खलनात अनाथ झालेल्या 13 बालकांचे शैक्षणिक पालकत्व पुण्याच्या भोई प्रतिष्ठानने स्विकारले आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलींद भोई, त्यांच्या सहकाऱ्यांच्या कल्पनेतून कोयनानगर मैत्री प्रकल्प कोयनेत सुरु केला आहे. दुर्घटनेनंतरचा रक्षाबंधन पहिला सण अपात्तीग्रस्तांसोबत प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनासोबत पुण्यात साजरा करणार आहे. प्रतिष्ठाननने प्रत्यक्ष लोकांच्या भेटी घेवून मुलांची माहिती घेतली आहे. त्यावेळी तीन बालकांचा वाढदिवस प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी कोयनानगर येथे केक कापून साजरा केला.
कोयनानगर येथे भोई प्रतिष्ठान सात दिवसांपासून कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत पुण्यातील भोई प्रतिष्ठानाने त्यांचे वैद्यकीय मदत पथक मदतीला आणले आहे. कोयनानगर परिसरातील पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी ते अहोरात्र कार्यरत आहेत. राज्यभरातून जीवनावश्यक वस्तूंची मदत येत आहे. परतू ज्यांनी प्रियजन दुर्घटनेत गमावले आहेत, त्यांना भावनिक व मानसिक आधार देण्यासाठी भोई प्रतिष्ठान पुढे सरसावले आहे. अशा अस्मानी संकटाने त्यांना खूप मानसिक धक्का बसला आहे. त्यांंना नव्याने उभे करण्यासाठी भोई प्रतिष्ठानातर्फे कोयना नगर मैत्री प्रकल्प’ सुरु केला आहे. विविध सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर्स यांचा त्यात समावेश आहे.
भूस्खलग्रस्त मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ज्यांचे पालक दुर्घटनेत गमावले आहेत, त्यांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानाने स्विकारले आहे. शिक्षणासाठी लागणाऱ्या योजना संस्थेतर्फे राबविल्या जाणार आहेत. त्या मुलांच्या शिक्षणासह अन्य सेवा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्याचा शुभारंभ रविवारी (ता. 22) रक्षाबंधनाच्या दिवशी पुण्यात होणार आहे. भूस्खलनग्रस्त गावातील बांधवाना, छोट्या मुलांना राखी बांधल्या जामार आहे. दुर्घटनेनंतर त्यांचा पहिला सण येतो आहे. त्यामुले त्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचे अश्रू पुसण्यासह त्यांना पुन्हा जिद्दीने व जोमाने उभे करण्याचा संकल्प भोई प्रतिष्ठानने केला आहे. कोयनानगर परिसरातील आपत्तीग्रस्त गावे शिरगाव, हुंबरळी, येथील ढोकावले ग्रामस्थ व विदयार्थी रक्षाबंधनात सहभागी होऊन एका अनोख्या नात्यात बांधले जाणार आहेत. अशी माहिती डॉ. भोई यांनी दिली.