पुणे प्रतिनिधी। घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन तिघेजण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी भोसरी परिसरात घडली आहे. या गॅस सिलेंडर मधून रात्रभर गॅस गळती सुरु होती. सकाळी उठल्यावर गॅस सुरु करायला गेल्यानंतर हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर अली आहे. मनीषा माऊली साळुंखे (वय 35), माऊली साळुंखे (वय 40), सिद्धार्थ साळुंखे (वय 13, सर्व रा. सिद्धेश्वर शाळेजवळ, दिघी रोड, भोसरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर वनवाडीमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच भोसरी अग्निशमन उपकेंद्राचे सब ऑफिसर नामदेव शिंगाडे, विकास नाईक, विठ्ठल भुसे, कुंडलिक भुतापल्ले, सुरज गवळी, शांताराम घारे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर शाळेजवळ साळुंखे कुटुंब एका इमारतीमध्ये छोट्या खोलीत भाड्याने राहतात. साळुंखे यांच्या गॅसमधून रात्रभर गळती झाली. तसेच थंडीमुळे दरवाजा खिडक्या बंद असल्याने गॅस खोलीत साठून राहिला. बुधवारी सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास मनिषा यांनी लाईटचे बटन सुरू केले असावे किंवा गॅस सुरू करण्यासाठी लाईटरचा वापर केला असावा. त्यामुळे अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे घरातील साहित्याने पेट घेतला तसेच मनीषा साळुंखे आणि त्यांचे पती माऊली साळुंखे व मुलगा सिद्धार्थ साळुंखे हे तिघेजण जखमी झाले आहेत. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात घबराट पसरली आहे.