अमरावती प्रतिनिधी । भाजप आरएसएसचा राष्ट्रवाद मुसोलिनी, हिटलरच्या विचाराने प्रेरित दुटप्पी राष्ट्रवाद असून नथुराम गोडसेंना मानणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाजपावर केली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्यासाठी नांदगाव पेठ येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
मोदींच्या विरोधात बोलले तर देशद्रोही ठरवलं जातं. पुलवामा हल्ल्याची चौकशी का झाली नाही? दीडशे किलो आरडीएक्स आलं कुठुन? १५ लाख देणार होते ते कुठं गेले ? असं म्हणत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाजपावर निशाना साधला.पंतप्रधान मोदी कलम ३७० वर बोलतात पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाहीत असा सवाल करत भाजप सरकारने निवडणूकीच्या वेळी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याची टीका बघेल यांनी केली. सरकारने आरबीआय मधून १ लाख ७४ हजार कोटी रुपये काढून उद्योगपतींच्या खात्यात टाकले आहेत. हेच पैसे शेतकऱ्यांना थेट दिले असते तर आर्थिक मंदी आली नसती असेही बघेल पुढे म्हणाले.
भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे देश आर्थिक मंदीच्या खाईत गेला आहे. देशातील बेरोजगारीला भाजप सरकारच जबाबदार असून देशात मंदीची लाट आहे पण छत्तीसगडमध्ये नाही असा निर्वाळाही मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी दिला.