पुण्यातील भुसार मार्केट आजपासून सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । पुणे मार्केट यार्डमधील भुसार बाजार हा संचारबंदी जाहीर झाल्यानंतरही सुरु होता. मात्र येथील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने बाजार प्रशासनाने काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे बाजार बंद ठेवण्यात आला होता. मात्र आजपासून भुसार मार्केट सुरु करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक घेऊन तातडीने बाजार सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार योग्य ती खबरदारी घेऊन सोमवार पासून भुसार मार्केट सुरु करण्यात आले आहे.

पुणे शहरात कोरोना विषाणूचे संकट गहिरे झालेले असल्यामुळे मार्केट यार्डात योग्य ती खबरदारी घेऊनच काम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देण्यात येणार असून गर्दी आटोक्यात राहण्यासाठी आवक मर्यादित ठेवण्यात येणार आहे. पुण्यातील मुख्य समजले जाणारे मार्केट यार्डातील भुसार मार्केट सुरु झाल्यामुळे पुणेकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

दरम्यान भुसार बाजारातील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे. यामुळेच घाबरून येथील प्रशासनाने बाजार बंद ठेवला होता. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट आदेश आल्याने त्यांनी सोमवारपासून बाजार पुन्हा सुरु केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत बाजार बंद राहता कामा नयेत अशा सूचना गेल्या आठवड्यात दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे प्रशासक आणि व्यापारी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तातडीने बाजार पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले होते.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.