नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटने महाराष्ट्रातील अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेत जमा केलेल्या 53 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे. नुकत्याच टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये बँक खाती उघडण्यात प्रचंड अनियमितता आढळून आल्यानंतर विभागाने हे पाऊल उचलले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) शनिवारी ही माहिती दिली.
त्यात म्हटले गेले आहे की,” विभागाने 27 ऑक्टोबर रोजी बँकेच्या मुख्यालयावर आणि अध्यक्ष आणि संचालकांच्या निवासस्थानावर छापे टाकले होते.” अधिकृत निवेदनात कोणत्या संस्थेवर छापा टाकण्यात आला हे उघड झाले नसले तरी सूत्रांनी ती ‘बुलडाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँक’ म्हणून ओळखली आहे.
1200 हून अधिक बनावट बँक खाती PAN शिवाय उघडण्यात आली
“कोअर बँकिंग सोल्युशन्स (CBS) वरील बँक डेटाचे विश्लेषण आणि छाप्यांदरम्यान प्रमुख व्यक्तींच्या स्टेटमेंटच्या विश्लेषणादरम्यान, हे उघड झाले आहे की, बँक खाती उघडण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आली होती,” असे निवेदनात म्हटले आहे. या शाखेत 1200 हून अधिक बँक खाती पॅनकार्डशिवाय उघडण्यात आली. यापैकी, 700 हून अधिक अशी खाती ओळखण्यात आली ज्यात खाते उघडल्याच्या सात दिवसांत, विशेषतः ऑगस्ट 2020 ते मे 2021 दरम्यान 34.10 कोटींहून जास्त कॅश जमा करण्यात आली.
कॅश डिपॉझिट्सच्या स्त्रोतांबद्दल माहिती नाही
“चेअरमन, सीएमडी आणि शाखा व्यवस्थापक कॅश डिपॉझिट्सचे स्त्रोत सांगू शकले नाहीत आणि त्यांनी कबूल केले की, हे बँकेच्या संचालकाच्या सांगण्यावरून केले गेले आहे, जो एक प्रसिद्ध स्थानिक व्यापारी आहे,” असे निवेदनात म्हटले गेले आहे. गोळा केलेले पुरावे आणि नोंदवलेल्या स्टेटमेंटच्या आधारे 53.72 कोटी रुपयांचे व्यवहार रोखण्यात आले आहेत.