उस्मानाबाद : जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे, ऐन नगरपंचयातीच्या निवडणूक तोंडावर आलेल्या असताना अनेक पदाधिकाऱ्यांनी कॉँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, माजी पंचायत समिती सदस्य दिपक रोडगे, इंद्रजीत लोमटे, श्रीशैल्य स्वामी, राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी काँग्रेसचे (आय) तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला आहे.
लोहारा तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा ग्रामपंचायती, काँग्रेस तालुक्यात मोठा पक्ष होता. लोहारा शहरातही तशीच परिस्थिती होती. शहरात काँग्रेसचे कार्यकर्ते, मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. परंतु मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातील नेते, कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन इतर पक्षाची वाट धरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील २४ जून रोजी परिवार संवाद दौऱ्याच्या माध्यमातून जिल्ह्यात आले होते. यावेळी तुळजापूर येथील कार्यक्रमात लोहारा शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, समन्वय समितीचे अध्यक्ष नागन्ना वकील यांनी समर्थकांसह जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांनी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे