हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ‘ मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ‘ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सर्वात मोठे पाऊल टाकण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात तब्बल ३४ हजार ८५० कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात एक लाख कोटींची गुंतवणूक करण्याचे लक्ष्य पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सरकारने १६ हजार काेटींच्या गुंतवणुकीचे करार केले होते. त्यातील ६० टक्के उद्योगांच्या जमीन अधिग्रहणासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या कार्यक्रमाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० बाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्योग विभागाकडून जी महत्त्वाकांक्षी पावले टाकण्यात येत आहेत त्याचे कौतुक केले. मला उद्योग खात्याचा अभिमान आहे, असे ते म्हणाले. उद्योग क्षेत्रात विश्वास महत्त्वाचा असतो आणि गुंतवणूकदार व राज्य शासन या दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मागील सामंजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आज सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. ही फक्त सुरुवात आहे. येत्या काळात राज्यात १ लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी केली. ३५ हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्त्वाची गोष्ट असून महाराष्ट्र करोना संकटातून नुसताच बाहेर पडणार नाही तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
या कंपन्या करणार गुंतवणूक-
मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि. जपान
ब्राईट सिनो होल्डिंग प्रा. लि. भारत
ओरिएंटल एॅरोमॅटिक्स प्रा. लि. भारत
मालपानी वेअरहाऊसिंग पार्क भारत
एव्हरमिंट लॉजिस्टिक्स भारत
पारिबा लॉजिस्टिक्स पार्क भारत
ईश्वर लॉजिस्टिक्स पार्क भारत
नेट मॅजिक आयटी सर्व्हिसेस भारत
अदानी एन्टरप्राइजेस लि. भारत
मंत्र डेटा सेंटर स्पेन
एसटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स भारत
कोल्ट डेटा सेंटर्स इंग्लंड
प्रिन्स्टन डिजिटल ग्रुप सिंगापूर
नेस्क्ट्रा भारत
इएसआर इंडिया सिंगापूर
केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅन्युफॅक्चरिंग अशा क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. या कंपन्यांमार्फत जवळपास ३४ हजार ८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होणार आहे. तसेच यामुळे सुमारे २३ हजार १८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे सांगण्यात आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’