औरंगाबाद – कोरोना लसीचा किमान एक डोस घेतलेला असेल तरच गॅस, राशन व पेट्रोल मिळेल, असे आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील लसीकरणाचा आलेख उंचावण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना देखील संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. मुख्य सचिवांनी जिल्ह्याच्या लसीकरणाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्ह्याचा राज्यात लसीकरणात २६वा क्रमांक लागत आहे. जिल्ह्यात ५५ % लसीकरण झाले असून हे राज्याच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिक व संस्थावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.