औरंगाबाद – मालमत्ता कराची थकबाकी एक रकमी भरल्यास व्याजावर 75 टक्के सूट देण्याची घोषणा मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल केली. मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त घोषित केलेली ही विशेष व्याजमाफी योजना 28 फेब्रुवारी पर्यंत चालणार असल्याची माहिती मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.
मालमत्ता कराचा थकबाकी वर मनपा दरवर्षी चक्रवाढ व्याज लावते. त्यामुळे मूळ रकमेपेक्षा व्याजाची रक्कम जास्त होते. त्यामुळे शहरातील अनेक मालमत्ताधारक कर भरत नाहीत. ही बाब पुढे आल्याने योजना जाहीर करण्यात आली आहे. मनपा प्रशासकांनी आता महापालिकेच्या वर्धापन दिना पासून थकीत मालमत्ता करावरील शास्ती व विलंब शुल्कावर 75 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंबंधीचा 231 क्रमांकाचा प्रस्ताव सोमवारी प्रशासकांनी मंजूर केला. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत या योजनेचा लाभ मालमत्ताधारकांना घेता येईल. मात्र थकित रक्कम एक रकमी भरावी लागणार आहे तरच या योजनेचा लाभ मिळेल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.