हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बिहारमध्ये नुकताच सत्ताबदल झाला असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडत आरजेडी सोबत सत्तास्थापन केली आहे. नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असून लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. मात्र प्रसिद्ध राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी या एकूण घडामोडींवर भाष्य करत आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होईल असं भाकीत वर्तवलं आहे.
‘जन सुरज अभियाना’च्या संदर्भात दोन दिवसांच्या दौऱ्यावर प्रशांत किशोर समस्तीपूरला आले आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हंटल की, बिहारच्या राजकीय क्षेत्रात येऊन मला तीनच महिने झाले असून राज्यातील राजकारणाने 180 अंशात वळण घेतले आहे. मात्र आगामी काळात आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. अशी भविष्यवाणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारवरही निशाणा साधला.
तेजस्वी यादव यांच्या 10 लाख लोकांना रोजगार देण्याच्या विधानाला प्रशांत किशोर यांनी पलटवार केला आहे. येत्या एक ते दोन वर्षांत पाच ते 10 लाख नोकऱ्या दिल्या तरी मी माझे जन सुरज अभियान मागे घेईन आणि नितीश कुमार सरकारला पाठिंबा देईन. एवढ्या नोकऱ्या कोठून आणणार असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. आरजेडी- जेडीयू – काँग्रेस सरकारला लोकांचा पाठिंबा नाही पण नितीश कुमार हे खुर्चीवर फेव्हिकॉल लावून बसले आहेत आणि बाकीचे पक्ष त्यांच्याभोवती फिरतात असेही प्रशांत किशोर यांनी म्हंटल.