हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग येताना दिसत आहे. परंतु या सगळ्या घडामोडींमध्ये जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. येथे ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश ठाकरे गटासाठी (Thackeray Group) मोठा धक्का मानला जात आहे.
कोणत्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला?
मुंबईतील भाजप कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप नेते गिरीश महाजन आणि पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमात ठाकरे गटाचे तीन माजी नगराध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
- दशरथ महाजन – ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख
- किशोर निंबाळकर – माजी नगराध्यक्ष
- राजेंद्र चौधरी – माजी नगराध्यक्ष
- भगवान महाजन – अपक्ष नेते
तसेच, अनेक माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपचा प्रभाव वाढला आहे. मात्र ठाकरे गटाच्या संघटनेला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
यापूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ठाकरे गटातील अनेक नेते भाजपमध्ये गेले होते. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावरही मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असल्याने ठाकरे गटाच्या स्थानिक पातळीवरील ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपचे बळ वाढताना दिसत आहे.
शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ सुरू
एकीकडे भाजपने ठाकरे गटाला धक्का दिला असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) देखील मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटातील नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेत आहे. ‘ऑपरेशन टायगर’ या मोहिमेअंतर्गत अनेक माजी आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. ज्यात, माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर आणि मुंबईतील तीन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तसेच, वैजापूर आणि गंगापूर या मतदारसंघातील ही अनेक स्थानिक नेत्यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केला आहे.