सोलपूर | श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 1985 पासून भाविकांनी सोने आणि चांदीच्या अनेक लहान लहान वस्तू, दागिने अर्पण केले अाहेत. मंदिर समितीने शासनाच्या न्याय व विधी विभागाला सुमारे 19 किलो वजनाच्या सोन्याच्या आणि 450 किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू वितळवून त्यातून नवीन अलंकार करण्यासाठी परवानगी मागितली होती. शासनाने त्याला परवानगी दिली आहे.
कार्तिकी यात्रेनंतर मुंबईत सोने वितळवण्याचे काम शासनाने निर्देश दिल्यानुसार केले जाईल अशी माहिती प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. कार्तिक यात्रेनंतर 20 ते 25 नोव्हेंबर च्या दरम्यान मुंबई येथे सोने-चांदी वितळविण्या ची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
भाविकांनी दान स्वरुपात अर्पण केलेल्या लहान वस्तू आणि दागिने वर्षानुवर्षे साठवून ठेवण्यात आले आहेत. अशा सोन्याच्या वस्तू एकत्र करुन त्याची वीट तयार करावी अशी भूमिका मंदिर समितीच्या सदस्यांनी घेतली होती. 2015 पासून त्या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार सुरु होता. 2018 मध्ये शासनाने परवानगी दिली होती परंतु प्रत्यक्षात कार्यवाही मात्र झाली नव्हती.
नुकत्याच झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत सोने, चांदी वितळवून सोन्याची वीट करण्याएेवजी देवाला घालण्यासाठी त्या सोन्या चांदीतून अलंकार तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंदिर समितीचे माजी कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी शासनाकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या बदली नंतर नूतन कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन अाणि संबंधितांशी बोलणे देखील केले होते. त्यानुसार आता शासनाने मदिर समितीस सोने चांदी वितळविण्यास परवानगी दिली आहे. कार्तिकी यात्रेनंतर 20 ते 25 नोव्हेंबरच्या सुमारास ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
मंदिर समितीकडे सगळे मिळून सुमारे 28 किलो वजनाचे सोन्याचे अलंकार आहेत. त्यापैकी जुने दागिने तसेच ठेवण्यात येणार आहेत. एकूण 28 किलो सोन्यापैकी सुमारे 19 किलो छोटे दागिने आणि वस्तू आणि एकूण 900 किलो चांदी पैकी 450 किलो चांदी वितळवण्यात येणार आहे. शासनाने या प्रक्रियेसाठी नियुक्त केलेला अधिकारी, समितीचे तीन सदस्य, कार्यकारी अधिकारी हे वितळवण्या साठीच्या सोन्या चांदीच्या दागिन्याची यादी अंतिम करतील आणि नंतर पंढरपूर येथून मुंबईत शासनाच्या रिफायनरी मध्ये सोने चांदी जमा केले जाईल. तिथे सोने चांदीची तपासणी करुन त्याच्या नोंंदी करुन वितळवून त्याच्या विटा तयार केल्या जातील. वितळवलेल्या सोन्याचांदी पासून कोणते दागिने बनवायचे याचा निर्णय अजून झालेला नाही.शासन अाणि मंदिर समिती त्या विषयी निर्णय घेणार आहे.