हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणात एक मोठा निकाल दिला आहे. या निकालात पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार (Ajit Pawar) यांचा असल्याचे राहून नार्वेकरांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने देखील राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमदार अपात्र प्रकरणात राहुल नार्वेकर काय निकाल देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज राहुल नार्वेकर यांनी देखील अजित पवार यांच्याच बाजूने निकाल दिला आहे.
आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देताना राहूल नार्वेकर यांनी म्हटले की, “30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. दोन्ही गटांनी मूळ राष्ट्रवादी आपली असल्याचा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही. दोन्ही गटांना म्हणणं मांडण्याची संधी दिली. 30 जून रोजी 41 आमदारांनी अजित पवारांना अध्यक्ष मानले. हा निकाल देताना संख्याबळ लक्षात घेतले आहे. सचिवालयातील कागदपत्रांचाही निर्णय घेताना विचार करण्यात आला आहे”
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी देखील अजित पवार यांच्याच बाजूने निकाल दिल्यामुळे याचा शरद पवार गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने विधिमंडळाच्या बहुमतावर राष्ट्रवादी अजित पवारांचीच असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आमदार अपात्र प्रकरणात राहुल नार्वेकर तरी शरद पवार गटाला दिलासा देतील हे वाटले होते. परंतु नार्वेकर यांनी दिलासा देण्याऐवजी शरद पवार गटाला आणखीन एक धक्का दिला आहे.