टीम, HELLO महाराष्ट्र। बिहारची राजधानी पटना शहरात सध्या एक विचित्र गोष्ट दिसत आहे. या शहरात ठिकठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमार बेपत्ता असल्याचे बॅनर्स दिसत आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर नितीश कुमार यांचा फोटो देखील आहे.
सध्या सर्वाधिक चर्चेचे व वादग्रस्त असे ठरत असलेले नागरिकत्व दुरूस्ती विधेयक व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या मुद्यांवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मौन बाळगले असल्याने अशाप्रकारची बॅनरबाजी केली गेली असल्याचे दिसत आहे. बॅनर्सवर ‘ # CAB_NRC मौन’, ‘गूँगा- बहरा और अंधा मुख्यमंत्री’ असे देखील लिहिण्यात आले आहे. याचबरोबर बॅनर्सवरील चेहऱ्याला नीट पहा, अनेक दिवसांपासून दिसलेल नाहीत, शोधून देणाऱ्याचा बिहार आभारी राहील, तसेच, ‘अदृश्य मुख्यमंत्री पाच वर्षात केवळ शपथविधीच्या दिवशीच दिसले’, असे देखील बॅनर्सवर म्हटलेले आहे.
बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल युनायटेडचे (JDU) राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर हे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी म्हणजे ‘एनआरसी’बाबतच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. देशभरात एनआरसी लागू करण्याच्या विरोधात असल्याचं किशोर यांनी स्पष्ट केलं आहे. रविवारी सकाळी केलेल्या एका ट्विटद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, ‘एनआरसी म्हणजे नागरिकत्वाची नोटबंदी’ असल्याचं म्हटलं आहे.