औरंगाबाद : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून आणखी पाच दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले आहे. गुरुवारी देखील शहरातून दुचाकी लांबविल्याचे समोर आले होते. रवि अर्जुन चिंचोलकर (३७, रा. संभाजी कॉलनी, पिसादेवी रोड, हर्सुल) यांनी २९ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास घरासमोर दुचाकी (एमएच-२०-बीआर-३००८) उभी केली होती. त्यांची दुचाकी मध्यरात्री चोराने लांबवली.
आदील हबीब मोहम्मद (२१, रा. बाबर कॉलनी, कटकटगेट) याने ३० जून रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास उस्मानपुरा, ज्योतीनगरातील सिध्दी विनायक अपार्टमेंटसमोर दुचाकी (एमएच-२०-सीपी-००९८) उभी केली होती. चोराने अवघ्या दहा मिनिटात त्याची दुचाकी लांबवली. शेख अब्दुल रईस अब्दुल रशीद (४०, रा. शम्सनगर, शहानुरवाडी) याने १२ जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास एमजीएम रुग्णालयासमोर दुचाकी (एमएच-२०-डीवाय-११९५) उभी केली होती. चोराने त्यांची दुचाकी दोन तासात लंपास केली. तसेच पुष्कर महादेव रानडे (४९, रा. कौस्तुभा कल्पना हाऊसिंग सोसायटी, रेल्वे स्टेशन रोड, बन्सीलालनगर) यांची ७ जुलै रोजी घरासमोर उभी केलेली दुचाकी (एमएच-२०-डीआर-७४३६) मध्यरात्री चोराने लांबवली.
तर मोहन सुभाष सोनवणे (३३, रा. धनगर गल्ली, वाळुज) यांनी १३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मनिषानगरातील एका हॉटेलसमोर दुचाकी (एमएच-२०-एफटी-११३८) उभी केली होती. चोराने त्यांची दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात हँडल लॉक तोडून लांबवली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.