कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
समाजामध्ये नागरिकता संशोधन कायद्याच्या संदर्भात काँग्रेस, कम्युनिस्ट व काही कट्टर धर्मवादी लोक मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवत असल्याने सर्वसामान्य लोकांना कायद्याची योग्य माहिती व्हावी, याबाबत असणारे गैरसमज दूर व्हावेत आणि त्यामुळे देशभर विनाकारण निर्माण झालेली अस्वस्थता संपावी या हेतूने या कायद्यासंदर्भात कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम घेण्याचा निर्णय आज झालेल्या व्यापक सभेत घेण्यात आला.
सर्व संविधानीक प्रक्रिया पार पाडून केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा लागू केला आहे. मतपेटीच्या राजकारणासाठी विरोधी पक्ष व काही संघटना या कायद्याचा चुकीचा अर्थ लावून समाजात गैरसमज पसरवित आहेत ते दूर करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आणि आगामी कार्यक्रम ठरवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगर च्या वतीने आज गडकरी हॉल येथे विस्तृत बैठक घेण्यात आली यामध्ये भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच कोल्हापुरातील विविध तालीम संस्था व मंडळे यांचे प्रतिनिधी आणि आणि राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
बैठकीच्या सुरवातीला पुलवामा हल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बोलताना अधिवक्ता परिषदेचे अॅड.प्रवीण देशपांडे यांनी या कायद्या संदर्भातली पार्श्वभूमी व त्याचे कायदेशीर महत्त्व विषद केले. स्वातंत्र्योत्तर काळात सर्व पक्षांनी आशा प्रकारचा कायदा होण्याची भूमिका घेतली होती त्यानुसारच हा कायदा असल्याचे त्यांनी सांगितले. हा कायदा भारतातल्या कोणत्याही नागरीकाला लागू होत नसल्याचे व त्यामुळे कुठल्याही व्यक्तीने अथवा समाजाने याबाबत साशंकता अथवा भीती बाळगण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी नमूद केले. एका बाजूला अशा स्वरूपाच्या कायद्याची आवश्यकता पक्षाची भूमिका म्हणून जाहीरपणे मांडणे व दुसर्याा बाजूला कायदा अस्तित्वात आल्यानंतर मतपेटीच्या राजकारणासाठी त्याला विरोध करणे अशी दुहेरी भूमिका भाजपा व्यतिरिक्त सर्वच राजकीय राजकीय पक्षांनी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात याबाबत झालेल्या चर्चा, महात्मा गांधींसारख्या व्यक्तीने याबाबत स्पष्ट केलेली आवश्यकता तसेच संसदेत व संसदेबाहेर विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी असा कायदा होण्याबाबत मांडलेला आग्रह याची त्यांनी विस्तृत माहिती दिली. अन्य देशातून भारतात स्थलांतरित झालेल्या विविध समुदायांना अनेक शतकांपासून नैसर्गिकीकरणाच्या प्रक्रियेतून भारतात सामावले गेले व त्यांना नागरिकत्व दिले गेले. त्यामुळे अशा प्रकारचा कायदा होणे हे नवीन नाही. मुळात 1955 सालच्या नागरिकत्व कायद्यामध्ये केलेली ही छोटीशी सुधारणा आहे. ज्या धर्मवादी देशांमध्ये, तिथे असणाऱ्या अल्पसंख्यांक समुदायावर शतकानुशतके अत्याचार झाले आणि त्यातून त्यांची लोकसंख्या अत्यल्प होऊन त्यातील काहींनी भारतात स्थलांतर केले अशा समुदायांना नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे. या कायद्यामुळे भारतातल्या सध्याच्या एकाही नागरिकाचे नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी या कायद्याबाबत समाजात पसरविल्या जाणाऱ्या गैरसमजाचा ताकतीने प्रतिवाद करावा असा आग्रह त्यांनी केला. तसेच उपस्थित कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.
भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी या कायद्याच्या जनजागृतीसाठी कार्यकर्त्यांनी व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी कंबर कसली पाहिजे असे प्रतिपादन केले. संविधानाच्या चौकटीत संविधानाच्या अंतर्भूत प्रक्रिया पार पाडून झालेल्या कायद्याला मतपेटीच्या राजकारणातून व गैरसमजुतीतून होणारा विरोध हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. या माध्यमातून राष्ट्रविरोधी शक्ती आपल्या दारापर्यंत पोचत आहेत याची सर्वांनी जाण ठेवावी असे त्यांनी सांगितले. गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काही काम करण्याऐवजी ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण सर्वांनी या विषयांमध्ये कार्यरत राहिले पाहिजे व वज्रमुठ बांधली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये हिंदू एकताचे दिलीप मगदूम यांनी कोल्हापुरात मोठ्या संख्येने समर्थकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे असे सुचविले. कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांनी हा विषय अत्यंत प्रतिष्ठेचा असून कार्यकर्त्यांनी स्वतः समजून घ्यावा आणि अन्यानाही समजून सांगावा अशी भूमिका मांडली. नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांनी या कार्यक्रमाला वॉर्ड स्तरावर नेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. सरचिटणीस अशोक देसाई यांनी तरुणांपर्यंत हा विषय पोचवण्याचे महत्त्व सांगितले.
महेश उरसाल यांनी मुस्लिम समाजात पसरविण्यात येणाऱ्या गैरसमजांवर लक्ष केंद्रित करून ते गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत आणि या राष्ट्रीय विषयांमध्ये सर्व नागरिकांनी मोदी व शहा यांच्या पाठीशी राहावे असे सांगितले.
यावेळी उपस्थित हिंदवी ग्रुप चे सुदर्शन सावंत, दयावान ग्रुपचे गणेश पाटील, नंगीवली तालमीचे बाळासाहेब पाटील, तटाकडील तालमीचे राहुल पाटील, प्रसाद कुलकर्णी यांनी याबाबत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पूर्ण ताकतीने सहभागी होण्याची ग्वाही दिली.
देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महेश जाधव यांनी समारोपामध्ये हा केवळ भारतीय जनता पक्षाचा विषय नाही तर संपूर्ण देशाचा विषय आहे. एका बाजूला राष्ट्रप्रेमी नागरिक व दुसऱ्या बाजूला स्वार्थी राजकारणी आणि धर्मांध संघटना असा हा लढा सुरू झाला आहे असे सांगितले. विरोधक, मुस्लीम समाजात गैरसमज पसरवित आहेत. संविधानिक पद्धतीने झालेल्या कायद्याला विरोध म्हणजे एका अर्थाने राष्ट्रद्रोह असे प्रतिपादन त्यांनी केले. या सर्वावर उत्तर म्हणजे विरोधकांना धडकी भरेल असा कार्यक्रम करणे असे मत त्यांनी मांडले तसेच पुढील दिशा ठरविण्यासाठी व्यापक समिती गठीत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. देशाच्या व धर्माच्या रक्षणासाठी शिवरायांच्या मावळ्यांनी आज रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी केले.
यावेळी नगरसेवक अजित ठाणेकर, उमा इंगळे, भागयश्री शेटके, सविता भालकर, भाजपा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, संतोष भिवटे, उपाध्यक्ष गणेश देसाई, किशोरी स्वामी, भारती जोशी, सुनीता सूर्यवंशी, मंडल अध्यक्ष भरत काळे, विवेक कुलकर्णी, संतोष माळी, संदीप कुंभार, अक्षय निरोखेकर, निखिल मोर, ओंकार खराडे, सुनीलसिंह चव्हाण, दिलीप बोंद्रे, संजय साने, प्रसाद मुजुमदार, संतोष जाधव, रणजीत जाधव, सीमा बारामते, गायत्री राऊत, सुजाता पाटील, प्रमोदिनी हार्दिकर, सुलभा मुजुमदार, मंगला निप्पानिकर, अशोक लोहार, संदीप पाटील, अनिल काटकर, आसावरी जुगदार, यशवंत कांबळे, अनिरुद्ध कोल्हापूरे, श्रीकांत पोतनीस, सिद्धार्थ शिंदे, संदीप मिरजकर, शुभम तोडकर, महादेव बिरंजे, अरविंद वडगांवकर, विजय आग्रवाल, बापू राणे, रवींद्र घाटगे, दिग्विजय कालेकर, प्रसाद मोहिते, सफुर आत्तार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.