सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा नगरपालिका हद्दीमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नगरपालिकेमार्फत उभारावा, अशी मागणी भाजपच्या वतीने भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी निवेनाद्वारे केली. यावेळी गोसावी यांनी मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बापट यांना दिले.
विकास गोसावी यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, थोर क्रांतिकारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात सुधारणेची पुरोगामी परंपरा सुरू केली. भोवताली समाजात आढळणाऱ्या उणिवा, दोष, त्रुटी पाहून भविष्यात त्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधून काढणारा आणि त्या मार्गावर अगदी एकाकी पण बेधडकपणे वाटचाल करणाराच खरा समाजसेवक, समाजहितचिंतक अशी त्यांची ओळख आहे.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे कर्ते सुधारक होते.समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी अविरत कार्य केले ,अशा या समाजसुधारकांचा पुतळा सातारा शहरात उभारावा. लवकरच यासाठी सर्वसमावेशक अशी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा उभारणी व नियोजन समिती स्थापन करून या बाबतीत पाठपुरावा करण्यात येईल
यावेळी जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, ऍड प्रशांत खामकर, चित्रपटआघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, शैलेंद्र कांबळे, विक्रांत भोसले, प्रवीण शहाणे, उपाध्यक्ष नितीन कदम, चंदन घोडके, ओबीसी मोर्च्या शहर उपाध्यक्ष अविनाश खर्शिकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.