हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर कोणताही दिलासा मिळालेला नाही. केंद्रातून मदत कशी येते, याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
यापूर्वी मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी 25 हजार रुपयांची तात्काळ मदत देण्याची मागणी केली होती. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही तशी मागणी केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वत:च केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची नामी संधी चालून आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तसेच पिकांच्या नुकसानीबरोबरच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अतिवृष्टीमुळे खरवडून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना माती आणून जमिनीची मशागत करण्यासाठी एकराला साधारण 50 हजाराचा खर्च येतो. त्यामुळे सरकारने आता या खरवडून गेलेल्या जमिनी पुन्हा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. त्यासाठी विशेष योजना आखावी लागेल. याशिवाय, अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत. शेतातील पंप आणि सिंचनाची उपकरणेही पुरात वाहून गेली. या सगळ्याची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’